मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, शिवसेना हे नाव आणि पक्ष माझे वडील आणि आजोबांनी दिले आहे. ते दुसऱ्याला देण्याचा अधिकार कोणालाही नाही, अगदी निवडणूक आयोगालाही नाही. माझी शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. राज्यातील ध्रुवीकरणाच्या राजकारणावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो, त्या काळात महाराष्ट्रात जातीय हिंसाचार घडला नाही. सीएए-एनआरसीच्या वेळीही महाराष्ट्रात शांतता होती. उलट दिल्ली मात्र जळत होती. भाजपकडे विकासाचे मुद्दे नाहीत, म्हणून ते ध्रुवीकरण आणि लुटमारीवरच भर देतात.
भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या प्रचारावर जोरदार प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले की, भाजपचा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो में बाटेंगे’ असे म्हणत माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. ते एका विशेष मुलाखतीत बोलत होते. त्यांनी माझं सरकार गद्दारीने पाडलं आणि महाराष्ट्राला लुटायला सुरुवात केली. महाराष्ट्राची संपत्ती दोस्तांना वाटून गुजरातला घेऊन जाण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांनी भाजपला सडेतोड उत्तर देत, माझीच शिवसेना महाराष्ट्राच्या हितासाठी लढेल आणि भाजपच्या महाराष्ट्रविरोधी धोरणांचा पर्दाफाश करेल, असे ठामपणे सांगितले.