मुंबई – स्वातंत्र्यदिनी भारताच्या राष्ट्रपतींकडून निमंत्रितांसाठी आयोजित होणाऱ्या विशेष स्वागत समारंभासाठी मान्यवरांना निमंत्रण देण्याचा बहुमान महाराष्ट्र टपाल परिमंडळाला मिळाला आहे. राष्ट्रपती भवनात 15 ऑगस्ट रोजी हा महत्त्वाचा समारंभ होणार आहे. या निमंत्रणांचे विशेष महत्त्व विचारात घेऊन, महाराष्ट्र टपाल परिमंडळ या निमंत्रणांचे वितरण अतिशय अचूकतेने आणि काळजीपूर्वक सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. हे प्रतिष्ठेचे काम हाताळण्यासाठी विशेषत्वाने सज्ज करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या पथकाला विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रत्येक निमंत्रण अपेक्षित निमंत्रिताला व्यवस्थित तसेच वेळेत पोहोचेल, याची हमी देण्यासाठी अधिक काटेकोर शिष्टाचार नियमावलीची अंमलबजावणी केली आहे. पहिल्यांदाच ही निमंत्रणे आपापल्या क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पाठवली जाणार आहेत; यामध्ये डॉक्टर, आयुष व्यावसायिक, शेती तज्ज्ञ, शिक्षक, उर्जा संवर्धनासाठी काम करणारे आणि पीएम आवास योजना, स्वनिधी योजना, पीएम विश्वकर्मा योजना आणि पीएम उज्ज्वला योजना यांसारख्या विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे.
या सर्वांनीच असामान्य समर्पण आणि सेवा यांचे दर्शन घडवले आहे; या कार्यक्रमात त्यांचा समावेश करून त्यांच्या प्रयत्नांविषयी देशाची कृतज्ञता आणि मान्यता अधोरेखित होत आहे. महाराष्ट्र टपाल परिमंडळाला ही सन्मानाची जबाबदारी पार पाडताना अतिशय अभिमान वाटत आहे. प्रत्येक निमंत्रणाची हाताळणी अतिशय आदरपूर्वक व प्रामाणिकपणे करण्याची हमी परिमंडळ देत आहे.
निमंत्रित आणि निमंत्रक कार्यालय या दोघांनाही संपूर्ण समाधान देण्याचे लक्ष्य आहे; हे साध्य करण्यासाठी परिमंडळ मध्यवर्ती भूमिका बजावत आहे. प्रत्येक निमंत्रण अतिशय अचूकतेने आणि त्वरेने संबंधितांकडे पोहोचेल, हे सुनिश्चित करत आहे. जे आपल्या सर्वांना प्रेरणा देतात, त्यांचा सन्मान करणारा हा उपक्रम राष्ट्रसेवेतील उत्कृष्टतेची आणि विश्वासार्हतेची परिमंडळाची बांधिलकी बळकट करत आहे.