जळगाव – महावितरणच्या तारा चोरी प्रकरण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या गुन्ह्यात ताबडतोब गुन्हे नोंदवा तसेच यावर आळा बसविण्यासाठी मोठी कारवाई करावी असे निर्देश पोलीस प्रशासनाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील 360 जलजीवन योजनेची कामे झाली असून त्यांना तात्काळ वीज जोडण्या द्याव्यात, तसेच मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत दुरगामी परिणाम करण्यारी योजना असून त्याला गती द्यावी असेही पालकमंत्री यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
जिल्ह्यातील महावितरणच्या प्रश्नासंदर्भात आज शासकीय विश्राम गृह ( अजिंठा ) येथे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आ. सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, आ. चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हा पोलीस अधिकारी अशोक नखाते, महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल महाजन, महाजनकोचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड उपस्थित होते.
जिल्हा नियोजनच्या निधी मधून मागील 5 वर्षात सुमारे 1 हजार 400 एवढी विक्रमी रोहीत्र ( ट्रान्सफॉर्मर ) देण्यात आले. हे सगळे देऊनही वेळेत कामं होत नसतील तर लोकांमध्ये नाराजीची भावना निर्माण होते. त्यामुळे महावितरणने आपल्या कामात झपाट्याने बदल करावा आणि जिल्ह्यातील सगळी प्रलंबित कामे पूर्ण करावित असे सांगून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या डीपी साठी वितरण पेट्या आणि कट आउट चे प्रस्ताव जिल्हा नियोजनसाठीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत, गावागावात तारा लोंबकळत आहेत, त्यामुळे त्या अधिक धोकादायक आहेत. त्या तात्काळ दुरुस्त करून घ्यावेत. तसेच जीर्ण झालेले पोल बदलण्याची कार्यवाही करावी असे निर्देश देऊन जिल्ह्यात वीजेमुळे मयत झालेल्यांना तसेच गंभीर दुखापत झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावे असे आदेशही पालकमंत्री यांनी यावेळी दिले
आ.सुरेश भोळे, आ.संजय सावकारे, आ. चंद्रकांत पाटील यांनी महावितरण संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी प्रकल्प जिल्ह्यात मंजूर केले आहेत. त्या प्रकल्पाचे भूमिपूजन किंवा उदघाटन स्थानिक आमदारांना सोबत घेवून करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.