नाशिक : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणारा ‘छावा’ चित्रपट टॅक्स फ्री करा अशी मागणी ‘सुविचार मंच’चे संयोजक आकाश पगार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. नाशिक दौऱ्यावर आलेले राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांची आकाश पगार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन वरील मागणीचे निवेदन दिले. अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी बोलतांना दिले. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा उलगडणार आणि जीवनचरित्रावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि सिनेचाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमागृहाबाहेर येणारे प्रेक्षक डोळ्यातून अश्रू ढाळत असल्याचेही दिसून आले. अंगावर शहारे आणणारे प्रसंग आणि तितकेच दमदार डायलॉग हे शिवभक्तांचे रक्त सळसळ करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्र भूमीत जन्मलेला या दोन्ही महाराजांनी अखंड हिंदुस्थानचा इतिहास रचला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपट सर्वसामान्य जनतेला मोठ्या पडद्यावर अनुभवता यावा यासाठी हा चित्रपट टॅक्स मुक्त करावा अशी मागणी आकाश पगार यांनी केली आहे.
यापुर्वी देखील महाराष्ट्रात अनेकदा इतिहास तसेच महापुरुषांच्या जीवनसंघर्षावर आधारित चित्रपट टॅक्स फ्री केलेले आहेत. यापूर्वी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’’ चित्रपट, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘सत्यशोधक’ चित्रपट, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या जीवनावर आधारित ‘सचिन – अ बिलियन ड्रिम्स’ हा चित्रपट, एअर हॉस्टेस नीरजा यांच्या धाडसाची कहाणी असलेला ‘नीरजा’ हा चित्रपट, महिला बॉक्सर मेरी कोम यांच्या जीवनावरील ‘मेरी कोम’ चित्रपट, दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा ‘हिंदी मिडीयम’ आदी चित्रपटांना महाराष्ट्रात टॅक्स फ्रि करण्यात आल्याकडे देखील यावेळी लक्ष वेधण्यात आले. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनसंघर्षावर आधारित असणारा “छावा” चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.