नाशिक : अभिनेत्री ममता कुलकर्णी त्र्यंबकेश्वरमध्ये आमच्यासोबत कुंभमेळ्यामध्ये राहतील. काही जणांनी विनाकारण तेव्हा हा वाद पुढे आणला होता. आगामी कुंभमेळ्यात आमचा किन्नर आखाडा त्र्यंबकेश्वरमध्ये राहणार आहे. आमच्या आखाड्यासाठी सरकारने कायम स्वरुपीजागा द्यावी, अशी मागणी किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. नाशिक मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य शाखा अध्यक्ष पार्वती नंदगिरी , सचिव पायल नंदगिरी , सलमा गुरु , पवित्रा नंदगिरी , दुर्गा दास नंदगिरी , आदिनाथ नंदगिरी , मातंगी नंदगिरी , शिवानंद नंदगिरी , डॉ. सानवी नंदगिरी , साध्वी शिल्पा नंदगिरी , पितांबरा आनंद गिरी उपस्थित होते.आचार्य महामंडलेश्वर त्रिपाठी म्हणाल्या की , नाशिक जिल्हा असल्याने कुंभमेळा नाशिक नावाने ओळखले जावा. किन्नर आखाडा यंदाच्या कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरमध्ये जुन्या आखाडा सोबत अमृत स्नान करणार आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येत असल्याने हा कुंभ नाशिक कुंभ मेळा म्हणून ओळखला जावा. गोदावरी नदीमध्ये अमृत कलशातून थेंब पडले होते. गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधून प्रवाहित होते. नाशिक हा जिल्हा आहे, त्यामुळं नाशिकचा कुंभ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.यात कोणत्याही आखाड्यांनी राजकारण आणू नये. स्वच्छ, सुरक्षित व हरित कुंभमेळ्यासाठी शासनाला सर्व आखाड्यासह नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी केले.
पहिल्यांदाच कुंभमध्ये सहभाग
यंदा पहिल्यांदाच त्रंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात किन्नर आखाडा सहभागी होणार असल्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी सांगितले. प्रयाग प्रमाणेच नाशिक कुंभमेळ्यामध्ये किन्नर आखाडा हा भाविकांच्या आकर्षणाच्या केंद्र बिंदू असेल. किन्नरांचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक रोज किन्नर आखाड्याला भेट देत असतात. प्रयागराजमध्ये रोज तीन हजार लोकांचा लंगर होत होता. तसंच त्र्यंबकेश्वरला देखील मोठ्या संख्येनं भाविक किन्नर आखाड्याला भेट देतील. त्यामुळं आम्हाला स्वतंत्र जागा मिळावी, अशी मागणी आम्ही सरकारकडं केली असल्याचे ” लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी सांगितले आहे.