मुंबई : मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जगद्विख्यात शिल्पकार पद्मविभूषण डॉ. राम सुतार, पद्मश्री कविवर्य मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री अशोक सराफ, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, पर्यावरण प्रेमी अभिनेते सयाजी शिंदे, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, युवा उद्योजक इंद्रनील चितळे आदींचा सन्मान करण्यात येणार आहे.
चेंबुर येथील दि फाईन आर्ट सोसायटी, शिवा स्वामी ऑडिटोरियम, फाईन आर्ट चौक येथे सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत होणार्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे भूषविणार आहेत. याशिवाय पक्षाचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदारही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अशोक हांडे प्रस्तुत ‘मराठी बाणा’ संगीत कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.