पुणे – गणपती बाप्पा मोरया अशी हाक ऐकायला आतुरलेल्या भक्तांना आता अवघे पाच-सहा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. येत्या शनिवारी बाप्पांचे घरोघरी आगमन होणार असल्याने त्यांचे स्वागतही जंगीच झाले पाहिजे, यासाठी आरासाची खरेदी करण्याला भाविकांनी बाजारपेठांमध्ये गर्दी केली असून, बाजारपेठांमधील रेलचेल वाढली आहे. गणेशाच्या मूर्तींपासून ते त्याच्या बैठक व्यवस्थेपर्यंतच्या आरासाची तयारीच्या वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. इलेक्ट्रिक दिव्यांच्या माळा, आरासात मांडता येतील अशा शोभेच्या वस्तू, पूजेचे साहित्य, वस्तू, पडदे, पंचे, पीतांबर, फुलवाती, वाती, अगरबत्ती यासह अनेक गोष्टींनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत.
बुरूड आळीमध्येही बांबूपासून बनवलेल्या आरासाच्या कमानी आणि अन्य शोभेच्या वस्तू बनवून तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्या खरेदीसाठीही ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे त्याच उत्साहाने बाप्पाची बडदास्त दहा दिवस ठेवली जाते. त्यामुळे ही तयारीही जय्यतच केली जाते. प्रत्येकजण आपल्या आरासमध्ये वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे रॉ मटेरियलची खरेदीही मोठ्याप्रमाणात केली जाते. त्यासाठीही भाविकांनी गर्दी बाजारपेठेमध्ये गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे.