एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट

0

जळगाव : अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला पक्षांतर्गत संघर्ष म्हणून ख्याती असणाऱ्या फडणवीस-खडसे वादाला आता तिलांजली मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील सागर बंगल्यावर एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये काहीवेळ चर्चा सुरु झाली. या बैठकीवळी इतरही काही महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर काही महिन्यांमध्येच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. या संघर्षाने मध्यंतरीच्या काळात खालचे टोक गाठले होते. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केले होते. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड वितुष्ट निर्माण झाले होते.

मध्यंतरीच्या काळात एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याची घोषणा केली होती. यासाठी एकनाथ खडसे यांनी थेट दिल्लीतील भाजप श्रेष्ठींशी संधान बांधले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रातील भाजप पक्षसंघटनेवर प्रचंड वचक असल्याने एकनाथ खडसे यांचे भाजपमधील पुनरागमन लांबले होते. मात्र, एकनाथ खडसे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक सागर बंगल्यावर दाखल झाले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आमनेसामने चर्चा झाली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech