मुंबई – अठराव्या लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाचवा आणि शेवटचा टप्पा 20 मे 2024 रोजी पार पडल्यानंतर तब्बल 15 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज (4 जून) मतमोजणी हाती घेऊन निकाल जाहीर झाला. चर्चेत असलेल्या ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या दोन्ही मतदारसंघात ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तिकीट दिले. मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे, तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिंदे गट उद्धव ठाकरेंविरुद्ध पहिली निवडणूक लढवत होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार, शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा पराभव करत विजय निश्चित केला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केली होती. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांना शिंदे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली. याशिवाय ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी घोषित केल्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढत होईल, असे वाटले होते. मात्र श्रीकांत शिंदे यांनी 2 लाखांहून अधिक मतांनी विजयी मिळवत एकतर्फी निवडणूक जिंकली. त्यामुळे असे म्हणावे लागेल की, नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांचा गड राखला, तर श्रीकांत शिंदे यांनी त्यांची जागा राखण्यात यश मिळवले आहे.