रत्नागिरी : मंडणगडमध्ये एक हजार एकरमध्ये एमआयडीसी उभारली जाईल. त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी घोषणा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी केली. आंबडवे (ता. मंडणगड) या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आज सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने आंबेडकर यांची १३४वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामंत आणि कदम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला आणि अस्थिकलश स्थानी पुष्पहार अर्पण करण्यात आला. जगभरातून अभ्यासक आणि पर्यटक येतील असे भव्य-दिव्य स्मारक आंबडवे गावी उभारले जाईल. हे स्मारक बाबासाहेबांच्या विचारांचे म्हणजेच ज्ञानस्मारक असेल. बाबासाहेबांच्या विचाराला तडा घालवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महाराष्ट्र सरकार नक्की शासन करील, अशी ग्वाही पालकमंत्री आणि उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली. गेल्या तीन वर्षांपासून शासकीय जयंती कार्यक्रम इथे साजरा होत आहे, याचा मला अभिमान आहे.
बाबासाहेबांमुळेच मी आमदार, मंत्री होऊ शकलो. त्यांचे गाव माझ्या जिल्ह्यात आहे, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या जोरावर जगात देशाची आदर्श कारकीर्द सुरू आहे. बाबासाहेबांचे विचार वेगाने सर्वांपर्यंत पोहोचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. ती प्रमाणिकपणाने पार पाडू या, असे पालकमंत्री सामंत यावेळी म्हणाले. महसूल राज्यमंत्री कदम म्हणाले, बाबासाहेबांचे मूळ गाव माझ्या मतदारसंघात आणि पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. संविधान वाचून पाहिले, तर आपण जाती-धर्मांच्या बंधनातून बाहेर पडू. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा ही शिकवण बाबासाहेबांनी दिली. मंडणगडमध्ये एक हजार एकर क्षेत्रावर उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून एमआयडीसी उभी केली जाईल. पहिला टप्प्यात सहाशे एकर आणि दुसऱ्या टप्प्यात चारशे एकर भूसंपादन केले जाईल.
या एमआयडीसीमुळे तालुक्यात रोजगारनिर्मिती होईल आणि मुंबईत जाणारे स्थलांतर थांबेल. समाजकल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी संविधानाची उद्देशिका देऊन मंत्र्यांचे स्वागत केले. या वेळी विविध महिला बचत गट आणि विविध योजनांच्या लाभार्थ्यांना राज्यमंत्री कदम यांच्या हस्ते धनादेशांचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच दीपिका जाकल यांच्यासह विविध अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.