पुणे : अजित पवारांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या इव्हेंट कंपनी डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला व तो पोस्ट केला होता. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अरोरा यांच्यावर टीका सुरु केली होती. इव्हेंट कंपनीमुळेच अजित पवारांना यश मिळाले असा मेसेज जनतेत जातो, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून मिटकरींनी देखील अरोरा यांच्यावर टीका केली होती. विधानसभा निवडणुकीत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळालं हे कोणत्या पीआर कंपनीमुळे मिळाले नाही असे म्हणत हे केवळ अजित पवारांचे यश आहे, असे मिटकरींनी ट्विट केले होते. यावरून आज पार्थ पवारांनी मिटकरींना सुनावले आहे. राष्ट्रवादी पक्षानेही हे मिटकरींचे वैयक्तीक मत आहे, असे म्हटले होते. निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी अचानक गुलाबी रंग स्वीकारला होता, तेव्हा एका इव्हेंट कंपनीची चर्चा सुरु झाली होती. त्यावरूनच आता राष्ट्रवादीत अमोल मिटकरी आणि पार्थ पवार यांच्यात जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.