मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी ग्रोथ हब प्रकल्पांच्या कामांना वेग द्या – मुख्यमंत्री

0

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचे (एमएमआर) सकल उत्पन्न (जीडीपी) सन २०३० पर्यंत ३०० बिलियन डॉलर पर्यंत नेण्यासाठी एमएमआर ग्रोथ हब महत्त्वाचे आहे. त्यासाठी या क्षेत्रात विविध प्रकल्प हाती घेण्यात आले असून ही प्रकल्पांची कामे वेगाने करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबई महानगर प्रदेश ग्रोथ हब नियामक मंडळाची बैठक आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव सुजाता सौनिक, डॉ. शिरीष संख्ये यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी ग्रोथ हबच्या आतापर्यंतच्या कामकाजाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

फडणवीस म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेशाला ग्रोथ हब करण्यासाठी पर्यटन, उद्योग, नगर विकास, गृहनिर्माण, पर्यावरण आदी क्षेत्रांचे मोठे योगदान असणार आहे. याचा विचार करूनच ग्रोथ हब अहवालात विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. हे प्रकल्प जागतिक दर्जाचे व्हावेत, यासाठी प्रकल्पांच्या कामांचे संनियंत्रण केले पाहिजे. तसेच या प्रकल्पावर लक्ष ठेवण्यासाठी ग्रोथ हबमधील प्रकल्पांचा समावेश वॉररुममध्ये करून प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल डॅशबोर्डवर ठेवावे. तसेच या प्रकल्पांसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एक टीम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला ग्रोथ हब म्हणून विकसित करण्यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये अहवाल तयार करण्यात आला.यानंतर आतापर्यंत ग्रोथ हब संदर्भात ८ बैठका विविध स्तरावर घेण्यात आल्या. ग्रोथ हबमध्ये ३७ प्रकल्प, ८ धोरणे, १९ शासन निर्णय घेण्यात आले असून या प्रकल्पांची अमंलबजावणी 7 संस्थांद्वारे होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

गोरेगाव फिल्म सिटी प्रकल्पामध्ये आयआयसीटी उभारण्यात येणार असून तेथे जगातील अनेक स्टुडिओ येण्यास उत्सुक आहेत. पश्चिम उपनगर क्षेत्रात विशेष विकास क्षेत्र निर्माण करणे, एमबीपीटीच्या जागेचा विकास, वरळी डेअरीचा विकास, अनगाव सापे परिसराचा विकास, खारबाव एकात्मिक व्यवसाय केंद्र, बोईसर, विरार व ठाणे क्षेत्राचा विकास या प्रकल्पांचा समावेश ग्रोथ हबमध्ये आहे. याशिवाय वाढवण पोर्टचा एकात्मिक वाहतूक आराखडा, जागतिक दर्जाचे डेटा सेंटर तयार करणे, औद्योगिक जागांवर औद्योगिक शहरे तयार करणे, एमएमआर क्षेत्रात आरोग्य शहर उभारणे, गरिबांसाठी परवडणारी घरे उभारणे तसेच पर्यटनवाढी विशेष प्रकल्पांचा समावेशही ग्रोथ हब अंतर्गत करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रासाठी दीर्घकालीन, शाश्वत आणि जागतिक दर्जाच्या विकास आराखड्यातील प्रकल्पांच्या अंमलबजावणी संदर्भातील कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावेत. मुंबईत होणाऱ्या ‘वेव्ज’ कार्यक्रमात एमएमआर ग्रोथ हबचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी उत्कृष्ट सादरीकरण व्हायला हवे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्रीमती सौनिक यांनी निती आयोग व महाराष्ट्र शासनाच्या ग्रोथ हब विषयक संयुक्त अहवाल व त्यावर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. मुख्य सचिवांच्या परिषदेत महाराष्ट्राच्या मॉडेलचा विशेष उल्लेख व प्रशंसा झाली असल्याचे सांगितले. पर्यटन, उद्योग, नगर विकास, पर्यावरण, गृहनिर्माण आदी क्षेत्रांवर जास्त भर देण्याचे निर्देश प्रधानमंत्री महोदयांनी दिले आहेत. तसेच एमएमआर क्षेत्राबरोबरच आजूबाजूच्या परिसराच्या विकासावरही भर द्यावा, असे त्यांनी सुचविल्याचे मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी यावेळी सांगितले. यावेळी एमएमआर क्षेत्राच्या आर्थिक आराखड्याची ब्ल्यू प्रिंट, ग्रोथ हबसाठी आतापर्यंत घेतलेले निर्णय, महत्त्वाचे प्रकल्प व त्यांची सद्यःस्थिती, पर्यटन प्रकल्प, केंद्र राज्य समन्वय आदींवर चर्चा झाली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech