ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शिवजयंती निमित्त ‘गडपती’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी, सकाळी १० वाजता हा कार्यक्रम डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे पश्चिम येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात कर्तृत्ववान गडपतींचा सन्मान करून त्यांच्या समाजकार्याला सलाम केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीवर प्रेरित होऊन समाज कल्याणासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे. “जागर महाराजांच्या जनकल्याणकारी दूरदृष्टीचा! सन्मान ध्येयवेड्या कर्तृत्ववान गडपतीचा!” या घोषवाक्याने या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
सामाजिक व राष्ट्रहिताच्या दृष्टीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे , अभिजीत पानसे , अविनाश जाधव , गजानन काळे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे. ३० संस्थांना प्रत्येकी ११ हजार रूपये व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. गडपती कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रम, नेतृत्वगुण आणि समाजसेवेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड म्हणजे केवळ दगडमातीचे किल्ले नव्हेत, तर ते शौर्य, त्याग आणि नेतृत्वाचे प्रतीक आहेत. त्याच धर्तीवर आजच्या काळातील समाजासाठी निःस्वार्थ कार्य करणाऱ्या व्यक्तींना “गडपती” म्हणून गौरविण्यात येणार आहे. शिवरायांचे दुर्ग विचार या संदर्भात इतिहास अभ्यासक, व्याख्याते रविराज पराडकर तसेच दुर्ग संवर्धन या विषयी गडसंवर्धन समिती सदस्य महाराष्ट्र राज्य सचिन जोशी मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या या उपक्रमामुळे युवा पिढीमध्ये ऐतिहासिक वारशाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी व्यक्त केला आहे. गडपती कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार होऊन सामाजिक सलोखा आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होईल, असे मत पाचंगे यांनी व्यक्त केले आहे. कार्यक्रमासाठी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यापक तयारी केली असून, या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक आणि युवावर्ग उपस्थित राहणार आहे.