उबाठाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटलांच्या गाडीवर जमावाचा हल्ला

0

जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्यातच शिवसेना-उबाठा पक्षाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश माणिक पाटील यांच्या कारवर जमावाने हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यमान लोकप्रतिनिधी गुलाबराव पाटील यांच्यात आणि जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गुलाबराव देवकर यांच्या लढत आहे. प्रचाराच्या दरम्यान दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत. यात देवकर आप्पांच्या बाजूने रमेश माणिक पाटील यांनी अतिशय आक्रमकपणे भाषणे करून प्रचारात रंगत भरली होती. आता त्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या संदर्भात रमेश माणिक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ते आज रात्री दहाच्या सुमारास पथराड येथून येतांना चांदसर रेल्वे गेटजवळून आपल्या वाहनातून जात असतांना त्यांच्यावर मोठ्या जमावाने हल्ला केला.

रमेश पाटील यांच्या कारवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांची विचारपूस केली. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. रमेश पाटील यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात त्यांच्या एमएच 19 सीझेड 8200 या क्रमांकाच्या कारचा मागील बाजूला असलेला काच फुटल्या, तर समोरच्या काचाचेही नुकसान झाले. त्यांच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून तेथून वाहन जोरात पुढे गेल्यामुळे अनर्थ टळला अशी माहिती रमेश माणिक पाटील यांनी दिली. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस-शरचदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी रवींद्र भिलाजी पाटील यांच्या वाहनावर देखील धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रमेश माणिक पाटील यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच शिवसेना-उबाठा पक्षाचे उपनेते तथा जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी धरणगाव पोलीस स्थानक गाठून त्यांची विचारपूस केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech