मोदी ३.० फार काळ टिकणार नाही, निर्मला सीतारामन यांच्या पतीचे रोखठोक मत

0

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरु झाली आहे. एनडीए बहुमताच्या आकड्यावर रविवारी सरकार स्थापन करणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख यांनी पाठिंब्याचा प्रस्ताव दिल्याने भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला आहे.

त्यामुळे मोदी ३.० सरकारमध्ये भाजपला मित्रपक्षांना मोठा वाटा द्यावा लागणार आहे. मात्र असे असले तरी हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचे मत माजी निर्मला सीतारामन यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी मांडले आहे. परकला प्रभाकर यांनी आधीही भाजपला २४० पेक्षा कमी जागा मिळतील असे सांगितले होते. भाजप आता चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी आणि नितीशकुमार यांचा जेडीयू या मित्रपक्षांवर अवलंबून असला तरी ही युती कशी टिकेल, हा प्रश्न असल्याचे परकला प्रभाकर यांनी म्हटले आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर द वायरला दिलेल्या मुलाखतीमध्ये परकला प्रभाकर यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदींच्या आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीला यंदाचा लोकसभेचा निकाल हा अतिशय स्पष्ट शब्दात चपराक असल्याचे परकला प्रभाकर यांनी म्हटले आहे. परकला प्रभाकर यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांचा बाहुबली सारखी व्यक्ती असा उल्लेख केला. तसेच भारतातील जनतेने या निवडणुकीतून अगदी स्पष्टपणे सांगितले की नरेंद्र मोदी काय करत होते, त्यांचा अजेंडा काय होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने सरकार चालवले हे जनतेला आवडलेले नाही, असेही परकला प्रभाकर म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech