नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शुक्रवारी म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपांबद्दल चिंता व्यक्त केली. या आपत्तीमुळे बाधित झालेल्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि क्षेमकुशलतेसाठी त्यांनी मनापासून प्रार्थना केली. या कठीण प्रसंगामध्ये म्यानमार आणि थायलंडच्या सरकारांना आणि लोकांना सर्वतोपरी मदत करण्यास भारत सज्ज असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) लिहिलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले की, म्यानमार आणि थायलंडमधील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी आपल्याला चिंता वाटते. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि क्षेमकुशलतेसाठी प्रार्थना करत आहे. या संकटसमयी भारत दोन्ही देशांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. या संदर्भात, आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याची सूचना केली आहे. तसेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंड सरकारांशी संपर्कामध्ये राहण्यास सांगितले.