* मदर डेअरी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमीपूजन
नागपूर : विदर्भात धवलक्रांती घडून आणण्यासाठी राष्ट्रीय दूध उत्पादन विकास महामंडळ एनडीडीबी द्वारे संचालित मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मध्ये केले .नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथे मदर डेअरी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते .सुमारे ५५० कोटींच्या या प्रकल्पाव्दारे विदर्भातील दुग्ध उत्पादकांकडून दूध संकलित करून विविध दुग्ध उत्पादनांची निर्मिती नागपूरात होणार आहे .या कार्यक्रमाप्रसंगी एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ . मिनेश शहा उपस्थित होते.
२०१६ पासून मदर डेरी आणि महाराष्ट्र शासन यांच्यात दुग्ध उत्पादनाच्या साठी सामंजस्य करार करण्यासाठी आपण प्रयत्नशील होतो त्यातूनच महाराष्ट्र शासनाच्या नागपूरच्या दुग्ध योजनेच्या सिविल लाईन्स येथील जागेवर मदर डेअरीचा भव्य प्रकल्प उभा राहिला आहे असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. मदर डेअरीने आता पशुवैद्यकीय तज्ञांच्या मदतीने येथील स्थानिक गोपालकांच्या गाईंच्या चांगल्या वाणांसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे असे सांगून गडकरी यांनी मदर डेअरी मार्फत पशुवैद्यकीय तज्ञ एम्ब्रो ट्रान्सफर तसेच इन विट्रो फर्टीलायझेशन (आयव्हीएफ ) सारखे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत तसेच दुग्ध उत्पादकांपर्यंत पोहोचतील अशा रीतीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले .यामधून सुमारे १२ ते १५ लिटर प्रतिदिन दूध देणाऱ्या गाई जर विकसित केल्या तर महाराष्ट्राला हरियाणा किंवा पंजाब येथील गाई येथे आणण्याची गरज पडणार नाही असे गडकरी यांनी यावेळी नमूद केलें.
पशुधनाला चांगला चारा मिळण्यासाठी विदर्भात मुबलक प्रमाणात असणाऱ्या कापूस सरकी, तुर चुरी , तसेच मका यातून जिल्हानिहाय पशुधन विकसित करून ते किफायतशीर किमतीमध्ये दूध उत्पादकांना उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी मदर डेअरीला केली .नेपियर ग्रासच्या माध्यमातून वर्षभर हिरवा चारा या पशुधनाला उपलब्ध करून दिल्यास दूध उत्पादनात सुद्धा वाढ होईल असं त्यांनी सांगितलं .गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये दिवसाला ८० लाख लिटर दूध संकलन होते हीच स्थिती विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यात फक्त ५ लाख लिटर प्रति दिवस संकलन अशी आहे . ही स्थिती बदलणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
मदर डेअरीच्या मार्फत नागपूर येथील सुप्रसिद्ध अशी संत्रा बर्फीचे देखील विपणन होणे आवश्यक आहे .ही बर्फी शुद्ध अशा संत्र्यांचा पल्प वापरूनच तयार केली जाईल . त्यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा होईल असा विश्वास गडकरींनी यावेळी व्यक्त केला. गडकरींनी मदर डेअरीला गडचिरोली आणि वाशिम यासारख्या आकांक्षी जिल्ह्यांमध्ये देखील विशेष लक्ष देण्यासाठी सांगितले. या कार्यक्रमाला विदर्भातील शेतकरी, दुग्ध उत्पादक, एनडीडीबीचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.