प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घ्या – पंकजा मुंडे

0

मुंबई : पर्यावरण संवर्धनाचा ध्यास सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वानी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध सामाजिक संस्थांच्या सहयोगाने २२ एप्रिल, २०२५ जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुंबई येथील पवई तलाव स्वच्छता व संवर्धन अभियानाच्या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन गणेश घाट पवई येथे करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार दिलीप लांडे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, महानगरपालिका उपायुक्त संतोष दौड आदी उपस्थित होते.

यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरण रक्षणात कर्तव्य आणि हक्क या दोन्ही गोष्टींची जोड देण्याची गरज व्यक्त केली. निसर्गाने मानवाला भरभरून सर्व काही दिले, पण माणसाने मात्र अतिहव्यासाने सभोवतालच्या निसर्गाचे नुकसान केले. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी शासनाबरोबरच लोकसहभाग आवश्यक आहे. यासाठी आपण वेळीच जागृत होऊन पर्यावरण संवर्धनाचे कर्तव्य बजावण्याची नितांत गरज असून सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर महाराष्ट्र नक्कीच प्रदुषणुक्त होईल. नवरात्रीत ज्याप्रमाणे देवीची आराधना केली जाते. त्याप्रमाणे या सृष्टीची, वसुंधरेची आराधना केली पाहिजे. वसुंधरेला वाचविण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

निसर्ग रक्षणासाठी लोकाभिमुख चळवळ निर्माण करणार
जलयुक्त शिवार योजना, लेक माझी भाग्यश्री अशा योजनांना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जलयुक्त शिवार योजनेतून ग्रामीण विभागात पाणी टंचाईवर मात करण्यात यश मिळाले, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन पर्यावरण विभाग देखील निसर्ग रक्षणासाठी लोकाभिमुख चळवळ निर्माण करेल. पवई तलावाची स्वच्छता ही या चळवळीची सुरुवात असून नागरिकांचा वाढता सहभाग हे खूप मोठे योगदान ठरेल, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ अभियानाचा शुभारंभ
आज २२ एप्रिल पासून ते १ मे पर्यंतच्या नऊ दिवसाच्या राज्यस्तरीय ‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ या अभियानाचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला. त्यानिमित्त पवई तलाव स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी राज्याचे फूलझाड ताम्हण रोपाचे पंकजा मुंडे यांच्या हस्ते रोपण करण्यात आले. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून या अभियानाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका क्षेत्रात हे पर्यावरण संवर्धन अभियान राबवण्यात येणार आहे.

नऊ दिवस चालणाऱ्या या अभियानात नागरिकांना आपल्या पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे व राज्यातील नागरिकांना पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत सहभागी करून घेणे, असा या अभियानाचा उद्देश असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. या अभियानात पंचमहाभुतांच्या भूमी, जल, वायू, अग्नी, आकाश या पाच घटकांपैकी किमान एका घटकावर जागरूक नागरिक म्हणून संकल्प करून काम करावे. स्थानिक स्वराज संस्थांनी पुढाकार घेऊन नैसर्गिक जलस्त्रोतांची स्वच्छता, रिड्यूस, रियूज, रिसायकल यावर आधारित शाळा महाविद्यालयात नवीन प्रयोगांची स्पर्धा, ‘पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ’ याप्रमाणेच घोषवाक्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करून त्याचा पारितोषिक वितरण समारंभ प्रत्येक जिल्ह्यांच्या पालकमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी करावा, असे आवाहन या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने केले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्यस्तरावर युवकांशी संवाद साधून निसर्ग संवर्धनाच्या चळवळीत तरूणांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे, असे सांगितले. आमदार दिलीप लांडे यांनी पवई तलाव स्वच्छता अभियानाची सुरूवात निश्चितच कौतुकास्पद असून या तलावाचे संवर्धन ही येथील नागरिकांची गरज असल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमात वनशक्ती, निसर्ग संस्थान, हेल्पिंग हॅन्डस्, पर्यावरण दक्षता मंच, बुऱ्हानी फाऊंडेशन, राष्ट्रीय सेवा योजना या संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech