बनावट गुडनाइट उत्पादने पुरविणाऱ्या नकली उत्पादन युनिटवर मुंबई पोलिसांचा छापा

0

मुंबई : बनावट गुडनाइट फ्लॅश उत्पादने तयार करून ती मुंबईतील विविध किराणा दुकानांना पुरविणाऱ्या आशिष अंदाभाई चौधरीवर कारवाई करण्यात आली आहे. गुडनाइटसारखा प्रसिद्ध ब्रँड असलेल्या आणि घरगुती कीटकनाशक श्रेणीतील आघाडीचा ब्रँड असलेल्या गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) ने मुंबई पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली आहे. गुप्तचर संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी महाराष्ट्रातील वसईजवळील उत्पादन केंद्रावर छापा टाकला आणि कारवाई केली.

या छाप्यात मोठ्या प्रमाणात बनावट साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामध्ये सुमारे ५०,००० गुडनाइट फ्लॅशच्या रिकाम्या बाटल्या, ५०,००० गुडनाइट फ्लॅशच्या पॅकिंग कार्टन्स आणि १६,००० गुडनाइट विक्स यांचा समावेश आहे. या प्रकरणी १९५७ च्या कॉपीराइट कायद्याच्या कलम ६३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये बनावट उत्पादन निर्मिती आणि कॉपीराइट उल्लंघनाचा समावेश आहे. मुंबई पोलिसांचा तपास सुरू असून, या बनावट उत्पादनांच्या वितरण जाळ्याचा शोध घेऊन संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या ठोस कारवाईमुळे भविष्यात बनावट उत्पादनांची विक्री रोखली जाईल आणि ग्राहकांना केवळ अस्सल व सुरक्षित गुडनाइट उत्पादने मिळावित याची खात्री केली जाईल.

या प्रकरणावर भाष्य करताना गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL)च्या होम केअर विभागाच्या मार्केटिंग प्रमुख शिल्पा सुरेश यांनी सांगितले की, बनावट उत्पादनांचा प्रसार हा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी, तसेच FMCG उद्योगाच्या विश्वासार्हतेसाठी मोठा धोका आहे. अशी नकली उत्पादने केवळ बेकायदेशीरच नाहीत, तर ती मानवी आरोग्यास हानिकारकही ठरू शकतात. GCPL आपल्या ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी आणि अस्सल व सुरक्षित उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही आमच्या वितरण जाळे, स्थानिक प्रशासन आणि ग्राहकांच्या सहकार्याने नियमित गुणवत्ता तपासणी करतो. मुंबई पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या या यशस्वी कारवाईमुळे बनावट उत्पादनांविरोधातील आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना बळ मिळाले आहे आणि ग्राहकांचा गुडनाइट ब्रँडवरील विश्वास दृढ राहील.”

बाजारात बनावट गुडनाइट उत्पादने आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर, GCPL ग्राहकांना सावध राहण्याचे आणि केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याचे आवाहन करते. ग्राहकांनी खरेदीच्या दरम्यान खरी विक्री पावती (Sales Invoice) घ्यावी आणि बनावट गुडनाइट उत्पादने आढळल्यास किंवा असे उत्पादने विकणारे घाऊक/किरकोळ विक्रेते दिसल्यास त्वरित GCPL कडे तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदविण्यासाठी care@godrejcp.com वर ईमेल पाठवा किंवा 1800-266-0007 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधा.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech