नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील एशियन फायर वर्क्स या फटाके तयार करणाऱ्या कंपनीत आज, रविवारी भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोटात २ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर ३ कामगार जखमी असून त्यांना नागपुरातील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार नागपूर-काटोल मार्गावरील कोतवालबर्डी येथे एशियन फायर वर्क्स ही फटाके निर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीत फटाक्यांच्या कव्हर मध्ये बारुद भरुन त्याचे फटाके तयार करण्याचे काम सुरू असताना आज, रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला. या स्फोटात २ कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
भुरा लक्ष्मण रजत (२५, रा. बिलमा, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश) आणि मुनीम मडावी (२९, रा. शिवनी, जिल्हा मंडला, मध्य प्रदेश) अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर या अपघातात सौरभ लक्ष्मण मुसळे, घनश्याम लोखंडे आणि सोहेल ऊर्फ शिफान शेख हे कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात व नंतर नागपुरात दाखल करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक हर्ष पोतदार यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर, काटोल नगरपालिकांतून फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलवण्यात आल्या. ॲम्बुलन्स देखील घटनास्थळावर तैनात करण्यात आल्या. या स्फोटामागचे कारण नेमकं काय यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे.