नांदेड : अनेक वर्षापासून जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने पुढील वर्षापर्यंत म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीपर्यत त्यांचे स्मारक उभारणी करण्यात येईल, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली. आज नांदेड येथे मातोश्री मंगल कार्यालय, कौठा येथे धनगर समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. समाजातील वंचित, शोषित,उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी जे-जे करता येईल ते कामे करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार श्रीजया चव्हाण तसेच अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आतापर्यंत धनगर समाजाच्या विकासासाठी संविधानिक मार्गाने जे-जे करता येईल ते सर्व कामे केली आहेत. यापुढेही नियमांच्या चौकटीत राहून संविधानिक मार्गाने वंचित घटकांना न्याय मिळावा यादृष्टीने काम करण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासन सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. समाजाच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मकपणे शासनाकडे बाजू मांडण्यात येईल. ती कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.