पुणे : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी निकाल आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवलं आहे. दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाही, असं कोर्टाने म्हटलं. विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.
कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होतंय. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी आहेत.यात फाशीची शिक्षा होऊ शकत नाही. दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली असून पाच लाखांचा दंडही भरावा लागणार आहे. तर, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, वकीस संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी सव्वासातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. ज्यात वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश होता. यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत.
कट रचल्याचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडे याला निर्दोष ठरवण्यात आल्याने दाभोलकर कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. दोघांना शिक्षा झाली हे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दर्शवते. पण सुटलेले आरोपी आहेत, त्यांच्याविरोधात आम्ही वरच्या कोर्टात धाव घेऊ, असं हमीद दाभोलकर यांनी सांगितलं.