चंद्रपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भाजप महायुतीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी येथील चांदा क्लब ग्राउंडवर आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलतांना शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला समृद्ध करून जागतिक पातळीवर सन्मान वाढविण्याचे काम केले. मोदी यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी १५ लाख करोड रुपये दिले. अनेक महत्त्वपूर्ण योजना आणण्याची काम देखील केले गेले असे नमूद करीत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बनवा, महाराष्ट्राचा जो गौरव महाआघाडीच्या काळात गेला होता, तो त्याला पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे बोलताना दिली.
आम्ही राज्यातील छत्रपती संभाजीनगर, धारशिव, अहिल्यादेवी नगर असे शहरांचे नवे नामकरण केले, पण त्यासह अनेक उचललेल्या महत्वपूर्ण पावलांना उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षांनी विरोध केला. मोदींच्या नेतृत्वात राम मंदिर बनविले, ३७० कलम हटविण्याचे काम केले, तीन तलाक हटविले. सीएए घेऊन आलो. आता ‘वक्फ’चा कायदा बदलण्याची तयारी भाजप करीत असल्याचे सांगितले. गडचिरोली जिल्हा हा अनेक वर्षांपासून नक्षलवादाने ग्रस्त होता. त्या नक्षलवादाला समाप्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याची माहिती दिली. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, जिल्ह्यातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार यांच्यासह देवराव भोंगळे, करण देवतळे, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, हरीश शर्मा व महायुतीच्या घटक पक्षातील प्रमुख नेते प्रामुख्याने उपस्थित होते.