नाशिक : येथील मेळा व महामार्ग बसस्थानकांतील समस्यांसंदर्भात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे विधानभवनात बैठक झाली. महामार्ग बस स्थानकाचा विकास बीओटी तत्त्वावर करण्यासाठी पुढील महिन्यात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देत सरप्राइज व्हिजिट देण्याचा इशाराही मंत्री सरनाईक यांनी दिला. नाशिक येथील मेळा स्थानक व महामार्ग बस स्थानक येथील समस्यांसंदर्भात आमदार देवयानी फरांदे यांनी निवेदन दिले. यावेळी एसटीचेचे अधिकारी उपस्थित होते. परिवहन मंत्री सरनाईक यांनी आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या भूमिकेचे स्वागत केले. मेळा बस स्थानकाच्या स्वच्छतेसाठी व सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले. आपण कधीपण या बस स्थानकांना सरप्राईज भेट देऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे स्पष्ट करताना महामार्ग बस स्थानकाचा विकास बीओटी तत्त्वावर करण्यासाठी पुढील महिन्यात निर्णय घेतला जाईल असे आश्वासनही मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले. नव्याने विकसित केलेल्या मेळा बस स्थानकाची योग्य देखभाल, दुरुस्ती होत नाही. या ठिकाणी स्वच्छता व सुरक्षेची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. तसेच महामार्ग बस स्थानकाचे रूपडे बदलणे गरजेचे असून, नाशिकचे मध्यवर्ती बस स्थानक म्हणून महामार्ग बस स्थानकाचा वापर होणे गरजेचे आहे. या ठिकाणी एसटी महामंडळाची ३० हजार चौरस मीटरची जागा असून, आगामी सिंहस्थाचा विचार करून या बस स्थानकाचा विकास करणे गरजेचे आहे.