राष्ट्रवादीला NDA सरकारमध्ये मंत्रिपद नाही? फडणवीस तटकरेंच्या बंगल्यावर?

0

नवी दिल्ली – दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी वेगवान घडामोडी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसताना दिसत आहे. महायुतीत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीएच्या मंत्रिमंडळातील स्थान मिळणार नसल्याचं वृत्त आहे. भाजपच्या चार, शिंदेगटाच्या एका खासदाराला मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनादेखील पंतप्रधान कार्यालयाकडून संपर्क साधण्यात आलेला आहे. पण दादांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला १७ जागा मिळाल्या. महायुतीची कामगिरी सुमार झाली. अजित पवाराच्या राष्ट्रवादीनं ४ जागा लढवल्या. त्यातील केवळ १ जागा त्यांना जिंकता आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी त्यांची खासदारकी राखली. ते रायगडमधून विजयी झाले. बारामती, शिरुर, धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक हरल्या. हा पराभव अजित पवारांसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. पक्ष आणि चिन्ह मिळूनही अजित पवारांना लोकसभेत चमक दाखवता आलेली नाही. तर शरद पवारांनी बारामतीचा बालेकिल्ला राखत आणखी ७ जागा जिंकत मैदान मारलं.

एनडीए मंत्रिमंडळात सहभाग होण्यासाठी भाजपच्या चार आणि शिंदेसेनेच्या एका खासदाराला फोन आला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही खासदाराला अद्याप तरी मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल यांचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होतं. दोन दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा होती. पण पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप तरी राष्ट्रवादीतील कोणालाही फोन आलेला नाही. लोकसभेत अजित दादांची ‘ताकद’ समजल्यानं राष्ट्रवादीला मंत्रिपद नाकारलं जातंय का, अशी चर्चा जोर धरु लागली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech