ज्या – ज्या महापुरुषांनी महाराष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले अशा त्यांच्या महानुभवांच्या कार्याचा सन्मान या महोत्सवात असणार…
१ मे १९६० रोजी महाराष्ट्राच्या जनतेने सलग पाच दिवस दिमाखदार सोहळा साजरा केला होता त्यानंतर तब्बल ६५ वर्षांनंतर राष्ट्रवादीकॉंग्रेसच्यावतीने राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा असा दिमाखदार सोहळा…
कार्यक्रमस्थळी महाराष्ट्राच्या समग्र इतिहासाला उजाळा देणारी पाच दालने… ‘गर्जा महाराष्ट्र दालन’ …’विचारसुत्र दालन’ …’महाराष्ट्रधर्म दालन’ …’महाराष्ट्र रत्न दालन’ …’मुख्यमंत्री दालन’ … महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणार्या गौरव रथांची शोभायात्रा…महाराष्ट्रातील पाच कर्तबगार भगिनींचा आणि माजी मुख्यमंत्र्यांचा करणार सन्मान…
मुंबई : संगम कलेचा… सन्मान संस्कृतीचा… या भूमिकेतून संयुक्त महाराष्ट्राची ६५ वर्षाची गौरवशाली परंपरा… संस्कृतीचा जागर करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे १ ते ४ मे दरम्यान ‘गौरवशाली महाराष्ट्र’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. संयुक्त महाराष्ट्राची ६५ वर्षाची गौरवशाली परंपरा… संस्कृतीचा जागर होणार असून ज्या – ज्या महापुरुषांनी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये मोलाचे योगदान दिले अशा त्यांच्या महानुभवांच्या कार्याचा सन्मान या महोत्सवात असणार आहे.
१ मे १९६० रोजी मुंबईसह मराठी भाषिकांच्या संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने सलग पाच दिवस दिमाखदार सोहळा साजरा केला होता. त्यानंतर तब्बल ६५ वर्षांनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा असा दिमाखदार सोहळा साजरा होणार आहे. ज्या १०६ हुतात्म्यांनी महाराष्ट्रासाठी बलिदान दिले त्यांना ऐतिहासिक हुतात्मा चौकात मानवंदना देणारा हा सोहळा असून, नव्या पिढीला महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा कळावी यासाठी सलग चार दिवस महाराष्ट्राचा इतिहास, परंपरा व संस्कृतीचा जागर करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.
कार्यक्रमाच्याठिकाणी महाराष्ट्राच्या समग्र इतिहासाला उजाळा देणारी पाच दालने उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा सचित्र इतिहास मांडणारे “गर्जा महाराष्ट्र” दालन…महाराष्ट्राचा विचार घडवणार्या महापुरूषांचे “विचारसुत्र” दालन…संत-महात्म्यांची शिकवणूक सांगणारे ‘महाराष्ट्रधर्म’ दालन…विविध क्षेत्रात देशस्तरावरील व महाराष्ट्राचे सर्वोच्च पुरस्कार मिळवणार्या ख्यातनाम व्यक्तीचे ‘महाराष्ट्र रत्न’ दालन… राज्याच्या ६५ वर्षाच्या वाटचालीत सर्व मुख्यमंत्र्याच्या योगदानाची विशेष दखल घेणारे ‘मुख्यमंत्री दालन’…
महाराष्ट्राची परपंरा व संस्कृती बोलकी करणारी अशी समृध्द पाच दालने उभारण्यात येणार असून याचदरम्यान राज्यभरातून नद्यांचे पवित्र जलकलश आणि पवित्र व ऐतिहासिक ठिकाणावरील माती (मृदा) कलश घेऊन सहा प्रादेशिक विभागातून सहा ‘महाराष्ट्र गौरव कलश रथ’ १ मे रोजी मुंबईत दाखल होणार आहेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणार्या या गौरव रथांची शोभायात्रा १ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता निघणार असून यात्रेचा समारोप कार्यक्रमस्थळी होणार आहे.
दिनांक १ मे रोजी सायंकाळी ६ वाजता वरळी येथील जांबोरी मैदानावर या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ,माजी मंत्री दिलीप वळसे पाटील सर्व मंत्री, आजी – माजी खासदार, आजी – माजी आमदार, फ्रंटल सेलचे सर्व प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान होणार आहे. यामध्ये पद्मविभूषण जावेद अख्तर, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांची महाराष्ट्र गौरव गीतांची मैफिल होणार आहे. दिनांक २ मे रोजी सायंकाळी मराठी संस्कृतीची ओळख करून देणारा मराठी युवकांच्या “फोल्क आख्यान” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचदिवशी महाराष्ट्रातील पाच कर्तबगार भगिनींचा ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये देश व राज्यपातळीवर महाराष्ट्राची स्वतंत्र ओळख केलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मश्री श्रीमती अनुराधा पौडवाल, अर्जुन पुरस्कार विजेत्या नेमबाज राही सरनोबत, अर्जुन पुरस्कार विजेत्या धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे – पाटील, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार सन्मानित अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
तर दिनांक ३ मे रोजी राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करणार आहोत यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे आणि देशाचे नेते व चार वेळा राज्याचे नेतृत्व करणारे आदरणीय शरद पवार, उध्दव ठाकरे यांना सन्मानित केले जाणार आहे. यासंदर्भात आमच्या पक्षाचे वरीष्ठ नेते यांच्याकडे आदरपूर्वक जाऊन निमंत्रण देतील असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. यानंतर रात्री प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांची संगीतसंध्या रंगणार आहे.
दिनांक ४ मे रोजी सुप्रसिद्ध आरजे लाईव्हचे रोहित आणि जुईली राऊत यांच्या गीतांच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी यावेळी दिली. कार्यक्रम संपल्यावर राज्यातून आलेले जल व माती (मृदा) कलश गिरगाव चौपाटीवर ज्या ऐतिहासिक संयुक्त महाराष्ट्राचे अनेक लढे उभारले गेले तिथे कलशाचे विसर्जन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि मी करणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्राची अस्मिता नव्या पिढीसमोर यावी… महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास… परंपरा कळावी… पुन्हा एकदा ६५ वर्षानंतर तीच गौरवशाली परंपरा मनामध्ये ठेवत महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर करत नव्या पिढीनेसुध्दा उद्याच्या भवितव्यासाठी आपले योगदान विविध क्षेत्रात निर्माण करावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन केले आहे. चांदा ते बांदा असा महाराष्ट्र म्हटला जातो त्याच कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगडावरुन ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गौरव रथ यात्रेची सुरुवात करण्यात आली होती. राज्याच्या पाचही विभागातून येणार्या मंगलकलशाचे मुंबईत उत्साहात स्वागत केले जाणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला महाराष्ट्र कसा घडला याची माहिती देणारी चित्रफीत दाखवण्यात आली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश प्रवक्ते मुकेश गांधी आदी उपस्थित होते.