मुंबई – “मोदी शहांचा अहंकार जनतेने मोडून काढला. भाजपचा हा पराभव असून ना श्रीराम ना बजरंगबली त्यांच्यासोबत आहेत. ते आमच्यासोबत आहेत. महाराष्ट्राने नरेंद्र मोदींचा विजयरथ रोखला असून हा त्यांचा पराजय आहे.” अशा भावना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केल्या. देशामध्ये आता परिवर्तन दिसून येत आहेत. त्यामुळे मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
संजय राऊत म्हणाले की, “देशाने आणि देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना नाकारलेले आहे. स्वतःला देव समजणाऱ्या नरेंद्र मोदींनी आपला पराभव स्वीकारून गप्प बसावे. राहुल गांधींची कामगिरी नरेंद्र मोदींपेक्षा चांगला आहे. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाला शून्यापासून दीडशेपर्यंत घेऊन गेले. याउलट नरेंद्र मोदींनी पक्षाला सव्वा तीनशेहून पक्षाला सव्वा दोनशे पर्यंत आणले.” अशी टीका त्यांनी केली. तसेच, “आम्हाला काही ठिकाणी धनुष्यबाण चिन्ह नसल्याचाही फटका बसला. लोकांमध्ये विशेषतः आदिवासी पाड्यांमध्ये चिन्हामुळे आम्हाला फटका बसला. तसेच, मी ठामपणे सांगतो की मोदीजी सरकार स्थापन होत नाही. आता त्यांनी तोडफोड करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर जनता रस्त्यावर उतरेल, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
“देशात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप बहुमताचा आकडा पार करू शकेल, अशी अपेक्षा नाही. पण महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या 30 जागा येणार, हे मी पहिल्या दिवसापासून बोलतो आहे, आणि शेवटी तेच घडले आहे.” असे संजय राऊत म्हणाले. तसेच, “राहुल गांधींचे नेतृत्व आणि राज्यांची कामगिरी, ममता बॅनर्जी असो, शरद पवार असो किंवा अखिलेश यादव असो सर्वांनी मेहनत करून मोदी-शहांचा अहंकार मोडून काढला आहे. तसेच अयोध्या, फैजाबादमध्ये भाजपचा पराभव झाला… देशातील जनतेने नरेंद्र मोदींना नाकारले आहे, त्यांना समारोप दिला आहे,” असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.