पुणे – महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहिण योजना सुरु केली. या योजनेतून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून, या योजनेचा उद्या (ता. १७) पुण्यात शुभारंभ होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत. महिलांना केवळ १५०० रुपये दिले जात आहेत, अशी टीका करून विरोधकांनी योजनेकडे व्यापारी पद्धतीने बघू नये, भाऊबिजेची किंमत करायची नसते, असा अशी टीका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.
बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे दुपारी साडे बार वाजता हा कार्यक्रम होणार असून, पुणे जिल्ह्यातील महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. तर अन्य जिल्ह्यातील महिला ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेच्या सुदर्शना त्रिगुणाईत, सारिका पवार, किरन साळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप देशमुख, भाजपचे संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, या योजनेची अंमलबजावणी होत असताना विरोधकांकडून त्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महायुती सरकारने केवळ लाडकी बहिण योजना सुरु केली नाही. तर महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेतून वर्षातून तीन सिलेंडर मोफत, महिलांना रोजगार देण्यासाठी इ रिक्षा खरेदीसाठी अर्थ सहाय्य, बचत गटातील महिलांना भांडवल देणे, विद्यार्थिनींचे उच्च शिक्षण मोफत करणे अशा योजना राबविल्या आहेत. विरोधक यापूर्वी सत्तेत होते, त्यांना अशा योजना राबविण्याची संधी होती, पण त्यांनी निर्णय घेतले नाहीत याची त्यांना रुखरुख असेल असा टोलाही गोऱ्हे यांनी लावला.