नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर बेकायदा राहणाऱ्या भारतीयांना हद्दपार करण्यात आलं.त्यानुसार आतापर्यंत तब्बल ३३० भारतीय मायदेशी परतले. अमेरिकेतून पहिल्या तुकडीत आलेल्या अनिवासी भारतीयांच्या हाता पायात बेड्या घालण्यात आल्या होत्या. यावरुन जोरदार टीका देखील झाली होती. मात्र पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्याची माहिती काही प्रवाशांनी दिली आहे.
अमेरिकेने बेकायदेशीर स्थलांतरितांच्या तुकड्या टप्प्याटप्प्यात हद्दपार करणे सुरू आहे. या तुकडीतील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे सी-१७ हे लष्करी विमान ९० मिनिटे उशीराने अमृतसरला पोहोचले. ५ फेब्रुवारीला हद्दपार झालेल्या लोकांप्रमाणे आम्हालाही हातकड्या आणि बेड्या घातल्या गेल्या. ६६ तासांचा हा प्रवास नरकासारखा होता. पण हे आमच्या सुरक्षिततेसाठी होते. कारण इतरांच्या मानसिक स्थितीचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही आणि त्यामुळे काहीही होऊ शकते. अमेरिका आपले नियम पाळत होती, असं एका भारतीयाने सांगितले.
दुसरीकडे, विमानतळावर तैनात असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हद्दपार झालेल्यांमध्ये ५ महिलांचा समावेश होता. गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही मुलांना बेड्या घातल्या नव्हत्या. या लोकांना खूप कमी जेवण देण्यात आले होते. त्यांनी १५ दिवस अंघोळ केली नव्हती आणि दात देखील घासले नव्हते. दरम्यान, अमृतसरला पोहोचल्यानंतर या लोकांचे इमिग्रेशन आणि पार्श्वभूमी तपासण्यात आली. यानंतर १६ फेब्रुवारीला सकाळी त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. हरियाणा आणि पंजाब सरकारने आपापल्या राज्यातील लोकांना घरी पाठवण्यासाठी विमानतळावर विशेष व्यवस्था केली होती.
५ फेब्रुवारी रोजी अमेरिकेने १०४ भारतीयांना हद्दपार केले होते, तेव्हाही संपूर्ण प्रवासादरम्यान प्रवाशांच्या हातांना हातकड्या लावण्यात आले तसेचं त्यांचे पायदेखील साखळदंडांनी बांधलेले होते. यावरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका झाली. तसेच हे प्रकरण संसदेपर्यंत पोहोचल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना राज्यसभेत उत्तर द्यावे लागले. परंतु पुन्हा एकदा अशाच प्रकारची अमानुष वागणूक तिसऱ्या तुकडीला देण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.