सेऊल – अंतराळातून लष्करी हेरगिरी करण्याच्या उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. सोमवारी उत्तर कोरियाने एक लष्करी हेरगिरी उपग्रह प्रक्षेपण करण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला असून प्रक्षेपण केल्यानंतर काही काळातच उपग्रह घेऊन जाणा-या रॉकेटच्या ठिक-या उडाल्या.
जर उत्तर कोरिया या उपग्रह प्रक्षेपणात यशस्वी ठरला असता तर अंतराळात आपल्या दुसरा हेरगिरी उपग्रह तैनात करण्यात त्याला यश आले असते. मात्र लष्करीदृष्ट्या सक्षम होत असलेल्या उत्तर कोरियाला या अपयशामुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. त्याचे कारण म्हणजे मागच्या वर्षी या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचे दोन प्रयत्न अपयशी ठरले होते. यावेळीही प्रक्षेपण केल्यानंतर उपग्रह घेऊन जाणारे रॉकेट अवघ्या ३० सेकंदांमध्येच फुटले. मात्र असे असले तरी उत्तर कोरियाने मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आपला पहिला हेरगिरी उपग्रह अंतराळात तैनात करण्यात यश मिळवले होते.
उत्तर कोरियाच्या नॅशनल एअरोस्पेस टेक्नॉलॉजीने सांगितले की, नव्या उपग्रहाला घेऊन जाणा-या रॉकेटमध्ये स्फोट झाला. रॉकेट हवेत असताना याची पहिली स्टेज पूर्णपणे कार्यरत होऊ शकली नाही. अखेरीस हे रॉकेट हवेतच फुटले. प्राथमिक तपास अहवालामधून उत्तर कोरियाचे उपग्रह घेऊन जाणारे रॉकेट हे त्याच्या स्वदेशी लिक्विड फ्युएल रॉकेट मोटारीमध्ये बिघाड झाल्याने कोसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या अपघातामागची इतर कारणांचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, प्रक्षेपणादरम्यान उत्तर कोरियाचं रॉकेट कोसळल्याची माहिती सर्वप्रथम दक्षिण कोरिया आणि जपानने जगाला दिली.