आता सर्व शाळांमध्ये घुमणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’……..!

0

राज्य सरकारचा नवा शासन निर्णय

मुंबई :अनंत नलावडे  

आता राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत,परिपाठ, प्रार्थना आणि प्रतिज्ञेसोबतच राज्य गीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’अनिवार्यपणे घुमणार आहे.राज्य सरकारने यासंदर्भात मंगळवारी नवा शासन निर्णय (जीआर) जारी केला असून, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्य गीत म्हणून शाळांमध्ये वाजवावे,असे निर्देश देण्यात आले आहेत.हा निर्णय सर्व शासकीय, खासगी आणि सर्व बोर्डांच्या (सीबीएसई, आयसीएसई, आंतरराष्ट्रीय) शाळांना लागू असेल, असे शालेय शिक्षण विभागाने आपल्या निर्णयात ठळकपणे स्पष्ट केले आहे.

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत कवी राजा निळकंठ बढे यांनी लिहिले असून, संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केले आहे.हे गीत १ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्याचे अधिकृत राज्य गीत म्हणून घोषित झाले होते.आता शाळांच्या दैनंदिन सभेत राष्ट्रगीतानंतर या गीताच्या सुरुवातीच्या दोन ओळी (१०१ सेकंद) गायल्या जाणार आहेत. या निर्णयामागे विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमान आणि जागरूकता निर्माण करणे हा उद्देश आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी दिली.

हा शासन निर्णय १४ जानेवारी २०२५ रोजी जाहीर झाला होता.परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी येत्या शैक्षणिक सत्रापासून होणार आहे.यामुळे शाळांमध्ये मराठी भाषा आणि राज्य गीताचा प्रभाव वाढेल,असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला. “हा निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान आहे.यातून नव्या पिढीला आपल्या राज्याबद्दल अधिक माहिती मिळेल,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले. तथापि, काही शिक्षणतज्ज्ञांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत, की यामुळे शाळांचा वेळ आणि संसाधने कितपत प्रभावित होतील.

या निर्णयाचे स्वागत करताना काहींनी याला राजकीय रंग असल्याचा दावाही केला आहे.तरीही,सरकारने हा सांस्कृतिक पाऊल असल्याचे ठामपणे सांगितले आहे.त्यामूळे आता या गीताचा शाळांमध्ये कसा समावेश होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech