भुवनेश्वर – ओडिशातील पारादीप पोर्ट ट्रस्ट येथे चिनी जहाज जप्त करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे प्रकरण आर्थिक वादाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.पुढील आदेश येईपर्यंत जहाज बंदरात थांबवावे लागेल, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्यानुसार ओडिशाच्या अधिकाऱ्यांनी चिनी मालवाहू जहाज ताब्यात घेतले आहे. उच्च न्यायालयाने आर्थिक वादातून जहाज जप्त करण्याचे आदेश दिले होते. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. नौकानयन कायद्यानुसार, कोणत्याही जहाजाच्या मालकी, बांधकाम, व्यवस्थापन, ऑपरेशन किंवा व्यापारातून उद्भवणारे सागरी दावे लागू करण्यासाठी जहाज जप्त केले जाऊ शकते. ओरिसा उच्च न्यायालयाचा हा आदेश जहाज मालक आणि कार्गो शिपिंग कंपनी यांच्यातील आर्थिक वादानंतर आला आहे. माल कंपनीने कमी गंधकाच्या सागरी वायू तेलाची खेप पाठवली होती. पुढील आदेश मिळेपर्यंत जहाज ओडिशाच्या पारादीप बंदरातच राहील.
जहाजमालकाने 99.81 लाख रुपये दिले नसल्याचा युक्तिवाद शिपिंग कंपनीने उच्च न्यायालयात केला. सादर केलेली कागदपत्रे आणि युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने जहाज जप्त करण्याचे आदेश दिले होते.