भुवनेश्वर-ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा यंदा दोन दिवसांनी असणार आहे. त्यामुळे भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांचे रथ दोनदा ओढण्याची संधी भाविकांना मिळेल. तब्बल ५३ वर्षांनंतर हा योग आला आहे.दैतपती सेवक बिनायक दासमोहपात्रा यांनी सांगितले की, ५३ वर्षानंतर ‘नबाजौबाचे दर्शन’, ‘नेत्र उत्सव’ आणि ‘रथयात्रा’ एकाच दिवशी म्हणजे ७ जुलैला होणार आहेत. साधारणपणे नबाजौबाच्या एक दिवस आधी, रथांना लायन्स गेटकडे खेचण्यासाठी ट्रिनिटीची अग्यानमाला बाहेर आणली जाते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. ७ जुलै रोजी पहांडी येथे दुपारी २.३० वाजता देवतांना रथावर आणले जाईल. चेरा पहारासह रथावरील पुढील विधींना आणखी तीन ते चार तास लागतील आणि रथ ओढण्याचे काम संध्याकाळी ७ किंवा ८ वाजता सुरू होईल. त्या दिवशी रथ थोड्याच अंतरासाठी ओढले जातील. दुसऱ्या दिवशी गुंडीचा मंदिरात रथ ओढला जाईल. त्यामुळे यंदा भाविकांना दोनदा रथ ओढण्याची संधी मिळणार आहे, असेही ते म्हणाले.