नवी दिल्ली – लोकसभा अध्यक्षांसाठी आज झालेल्या मतदानानंतर एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला यांची १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. ओम बिर्ला यांच्या निवडीनंतर पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत नेले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. याआधी मोदींनी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. तर विरोधकांच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.
दरम्यान, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाबाबत एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात एकमत न झाल्याने विरोधकांनी मंगळवारी के. सुरेश यांना उमेदवारी दिली. तर एनडीएने १७ व्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला होता. अशा स्थितीत राजस्थानच्या कोटा-बुंदी लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा निवडून आलेले खासदार ओम बिर्ला आणि केरळच्या मावेलिकारामधून आठव्यांदा निवडून आलेले खासदार के. सुरेश यांच्यात थेट लढत होती. भारताच्या निवडणूक इतिहासात विरोधकांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा करण्याची ही पहिलीच वेळ होती.