पंढरपूर : महाराष्ट्रात सद्यस्थितीत विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व सौ. सायली पुलकुंडवार तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते आज पार पडली. वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ. सागरबाई बाबुराव सगर या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. सगर दापत्य हे गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. हे दाम्पत्य मागील १४ वर्षापासून नियमितपणे वारी करीत आहे. या दाम्पत्याला विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला. प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवर व मानाचे वारकरी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार म्हणाले, सर्व भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने विविध कामे हाती घेतली आहेत. भाविकांच्या सेवेसाठी दर्शन मंडप स्काय वॉक, दर्शन रांग आदी विविध सुविधांची कामे प्रस्तावित केली आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सतत पाठपुरावा करीत आहेत.
भविष्यात पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध होतील. तसेच महाराष्ट्रात सद्यस्थितीत विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत ही निवडणुकीची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडो जास्तीत जास्त संख्येने मतदार राजांनी भाग घेऊन देशाची लोकशाही बळकट होण्यासाठी सर्व भाविकांचा तसेच जनतेचा सहभाग लाभो असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्तिकी एकादशी यात्रा 2024 निमित्त मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आलेली आहे.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी प्रास्ताविकात सांगितले की, श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांना मंदिर समितीमार्फत पत्रा शेड, दर्शन रांग, दर्शन मंडप आदी ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच मंदिर समिती मार्फत मोफत अन्नदान करण्यात येत आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिसरातील परिवार देवतांच्या मंदिराच्या जिर्णोद्वाराच्या अनुषंगाने जतन व संवर्धन कामास सुरवात झाली असून, मंदिरास मुळ रूप येत आहे. याशिवाय, दर्शनरांगेत स्कायवॉक व दर्शनहॉल बांधकामास देखील लवकर सुरुवात करून दर्शन रांगेतील भाविकांना कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच भाविकांसाठी येत्या आषाढी वारीपर्यंत टोकन दर्शन व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.