‘मुंबई पुष्पोत्सवा’ची दीड लाख मुंबईकरांना भुरळ !

0
मुंबई :  विविधरंगी फुलांनी सजविलेली राष्ट्रीय प्रतिके, बोधचिन्ह तसेच फळे व फुलं भाज्यांची रेलचेल यासह बगीच्यासाठी लागणारी खते-अवजारे आदींच्या खरेदीसाठी जमलेले मुंबईकर आणि आकर्षक फुलांना पाहण्यासाठी-अनुभवण्यासाठी आलेली लहान मुले, अशा वातावरणात मुंबई पुष्पोत्सवाचा समारोप झाला. तब्बल दीड लाख मुंबईकरांनी या पुष्पोत्सवाला अर्थातच वार्षिक उद्यान विद्या प्रदर्शनाला भेट दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त (उद्याने) चंदा जाधव, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली आयोजित या उपक्रमाला नागरिक आणि पर्यटकांनी अतिशय उदंड प्रतिसाद दिला.
यंदाच्या पुष्पोत्सवासाठी ‘राष्ट्रीय प्रतिके’ ही संकल्पना घेवून उद्यान विभागाने रुपया, तिरंगा ध्वज, गंगानदी, गंगा डॉल्फिन, आंबा, मोर, जिलेबी आदींच्या पुष्प प्रतिकृती साकारल्या. फळांच्या विविध प्रजातींची रोपटे, विविध फुलझाडे, वनस्पती औषधी आदींचा त्यात समावेश होता. यावर्षीच्या पुष्पोत्सवात तब्बल पाच हजार कुंड्यांचा वापर करण्यात आला.
तीनही दिवसात मुंबईतील विविध शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाचे अभ्यासक आदींनी देखील भेट दिली. मुंबई पुष्पोत्सव दरवर्षी वेगळी संकल्पना घेऊन मुंबईकरांच्या भेटीस येत असतो. यंदा भारतातील राष्ट्रीय प्रतिके हा विषय घेऊन हा पुष्पोत्सव भरविण्यात आला होता. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक मुंबईकराला आणि पर्यटकाला आपली राष्ट्रीय प्रतिके फुलांनी सजविलेले पाहून मनस्वी आनंद झाला.
अभिनेता जॅकी श्रॉफ, श्वेता बच्चन, अभिनेता अरुण कदम, अभिनेत्री नेहा जोशी यांच्यासह विविध सिनेकलाकार, प्रतिष्ठित व नामवंत नागरिक यांनी देखील पुष्पोत्सवाला भेट दिली. प्रदर्शनासोबतच उद्यानविषयक वस्तुंची विक्री, फुले-फळे झाडांसाठी लागणारे खत आदींची दालने या ठिकाणीही नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. तीन दिवस चाललेल्या या ‘मुंबई पुष्पोत्सवा’स मुंबईकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबईकर नागरिकांचे आभार मानले आहेत.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech