नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलीय. यासंदर्भात हिवाळी अधिवेशनात अध्यादेश येण्याची शक्यता आहे. परंतु, एक देश एक निवडणूक हे व्यावहारिक नसल्याचा आक्षेप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी घेतला. यावर टीका करताना खर्गे म्हणाले की, ‘एक देश, एक निवडणूक’ हे व्यावहारिक नाही. निवडणुका जवळ आल्या की खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष वळवण्यासाठी भाजप अशाप्रकारे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मार्चमध्ये अहवाल सादर केला होता. यासंदर्भात खर्गे म्हणाले की, हा प्रस्ताव व्यवहार्य नाही. हे चालणार नाही. जेव्हा निवडणुका येतात आणि त्याला मांडण्यासाठी कोणताही मुद्दा मिळत नाही, तेव्हा तो खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष वळवतो.
यापूर्वी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावरील कोविंद समितीचा अहवाल स्वीकारला आहे. एकाचवेळी निवडणुका घेण्यास कोविंद समितीला व्यापक पाठिंबा मिळाला आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने एकमताने मंजुरी दिली आहे. कोविंद समितीच्या शिफारशींवर भारतातील विविध मंचांवर चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले. एकाचवेळी निवडणुका घेण्यास अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. येत्या काही महिन्यांत आम्ही एकमत घडवण्याचा प्रयत्न करू असे वैष्णव यांनी सांगितले.