संजय राऊत यांचे भाजापवर टीकास्त्र
मुंबई – देशात आणि राज्यात पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच वन नेशन वन इलेक्शन सारखे फंडे भाजप राबवत आहे. भविष्यात नो इलेक्शन हा त्यांचा नारा असून त्याची सुरुवात आतापासून झाल्याचे सांगत भाजपच्या अशा धोरणांमुळे देशाला धोका निर्माण होईल त्यामुळेच वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पनाच संविधान विरोधी आणि देशातील लोकशाहीला घातक आहे अशा शब्दांत शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते,खा.संजय राऊत यांनी गुरुवारी थेट येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांच्यावर टीकास्त्र सोडले.
केंद्र सरकारने बुधवारी देशात वन नेशन,वन इलेक्शन प्रस्तावाला मंत्रिमंडळात दिलेल्या मंजूरीवरही खा. राऊत यांनी जोरदार टिका केली. भाजपने आधी महापालिका आणि राज्याच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवाव्यात,असे आव्हान देत राऊत यांनी तीन वर्षात साध्या महापालिका निवडणुका ते घेऊ शकलेले नाहीत, असा आरोप केला.
मणिपुरात पळून जाणाऱ्या सरकारने वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा,हे आश्चर्यकारक आहे. आपला देश लोकशाही प्रधान असून भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही देश आहे.येथे प्रत्येक प्रांत, भाषा, विविध संस्कृती आहेत. आणि याचा विचार करून घटनाकारांनी संविधान बनवले आहे. मात्र आता तेच संविधान बदलण्याचा प्रयत्न काही शक्तिंकडून होत असून एकाचवेळी ईव्हीएम किंवा यंत्रणेचा गैरवापर करत केंद्र आणि राज्यातील निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही खा.राऊत यांनी केला.
संसदेत याबाबतचे विधेयक येण्यापूर्वी इंडिया आघाडीचे नेते एकत्र बसून यावर चर्चा करतील,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सत्ताधारी भाजप निवडणुकांवर खर्च होतो, असे त्यांचे म्हणत असेल तर त्यांनी आधी देशातील लूट,भ्रष्टाचार आणि दरोडेखोरी आधी थांबवावा,अशी मागणी करत निवडणूकीवर होणारा खर्च ही लूट नाही, तरं ती लोकशाहीची गरज आहे.आज महाराष्ट्रात प्रत्येक टेंडरमध्ये घोटाळेच सर्रास सुरू असून मुंबई,पुणे, नागपूरसारख्या माहापालिकेत प्रशासकांच्या माध्यमातूनही मोठी लूट सुरू आहेत. त्यामुळेच ही लूट करता यावी, यासाठीच महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येत नाही,असाही थेट घणाघात त्यांनी भाजपवर केला.
यावेळी जागावाटपा संदर्भात उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले की, महाविकास आघाडीत जागावाटप करत असलो तरी आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.आम्ही सर्व मित्रपक्षांशी चर्च करूनच प्रत्येक जागेवर चर्चा करत आहोत. कारण जिंकेल त्याची जागा हेच आम्ही सर्व सूत्र राबवत असून मुंबईसह राज्यातीलही जागावाटप लवकरच पूर्ण होईल. आचारसंहिता लागण्यापूर्वी आघाडीचे जागावाटप पूर्ण झालेले असेल, असे स्पष्ट करत लोकसभा निवडणुकीत योग्य जागावाटप झाल्यानेच मोदींचा पराभव झाला.त्यामुळे आता याहीवेळी राज्यातील शिंदे,फडणवीस,अजित पवार या त्रिकुटाचा देखील महाविकास आघाडी दारुण पराभव करेल,असाही ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.