सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याने जावयाला मारले
चंदीगड – चंदीगड येथील जिल्हा कुटुंब न्यायालयात आज, शनिवारी गोळीबाराची घटना घडली. यात सेवानिवृत्त पोलिस अधिकारी असलेल्या सासऱ्याने आयआरएस अधिकारी असलेल्या जावयाचा खून केला. मलविंदर सिंग सिद्धू असे आरोपीचे नाव असून ते पंजाब पोलिसांतील निवृत्त एआयजी आहेत. तर हरप्रित सिंग असे मृतक जावयाचे नाव असून ते कृषी विभागात कार्यरत होते.
यासंदर्भातील माहितीनुसार, दोन कुटुंबांमध्ये काही महिन्यांपासून घरगुती वाद सुरू होता. या प्रकरणी शनिवारी तिसऱ्यांदा दोन्ही पक्ष मध्यस्थीसाठी चंदीगड फॅमिली कोर्टात पोहोचले होते. सुमारे दीड महिन्यांपूर्वी दोन्ही पक्षकारांमध्ये तोडगा काढण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात धीरज ठाकूर या वकीलाची नियुक्ती करण्यात आली होती. आयआरएस अधिकारी हरप्रीत सिंग, मुलाच्या बाजूने, त्याच्या पालकांसोबत समझोता लिहून शनिवारी दुपारी 12 वाजता कुटुंब न्यायालयात पोहोचले. त्यानंतर दुपारी1.30 वाजता . मध्यस्थ वकिलामार्फत दोन्ही पक्षांमध्ये कराराची बोलणी सुरू होती. दरम्यान, निवृत्त आयजी मलविंदर सिंग सिद्धू यांनी बाथरूममध्ये जायचे आहे असे सांगितले. यावेळी जावई हरप्रीत सिंग त्यांना बाथरूमचा रस्ता दाखविण्यासाठी सासऱ्यांसोबत मध्यस्थी कक्षातून बाहेर आला तेव्हा काही सेकंदांनी बाहेरून गोळीबाराचा आवाज येऊ लागला. एकामागून एक चार-पाच गोळ्या झाडल्या गेल्याचे आवाज आले. वकिलाने खोलीबाहेर पाहिले तर सिद्धू हातात बंदूक घेऊन आपल्या जावयावर गोळीबार करत होता. घाबरलेल्या वकिलाने खोलीचे दार आतून बंद केले आणि सर्वजण टेबलाखाली लपले. मध्यस्थी कक्षाच्या दाराकडेही गोळी झाडण्यात आली. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे इतर कर्मचारी आणि वकील जमा झाले आणि त्यांनी आरोपीला पकडून एका खोलीत बंद केले. माहिती मिळताच न्यायालयाच्या सुरक्षेसह स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी हरप्रीत सिंगला सेक्टर-16 रुग्णालयात नेले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.