जम्मू : भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या फ्लॅग मिटींगनंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत शुक्रवारी रात्री अखनूरच्या केरी बट्टल परिसरात गोळीबार केला. भारतात घुसखोरी करवण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या या गोळीबारात भारताचा एक जवान हुतात्मा झाला. दरम्यान भारताकडूनही पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याचेही सांगितले जात आहे. तिथे दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे. त्याच वेळी, पूंछमधील फ्लॅग मिटींगच्या दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा, सीमेपलीकडून हल्ला करण्यात आला. भारतीय लष्कराचे जवान पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर देत आहेत.
यासंदर्भात लष्कराने सांगितले की, अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक ज्युनियर कमिशन्ड अधिकारी शहीद झाला आहे. पण त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. केरी भट्टल परिसरातील जंगलातील एका नाल्याजवळ शुक्रवारी रात्री उशिरा जिहादी दहशतवाद्यांच्या हालचाली सतर्क सैन्य दलाच्या जवानांना दिसल्या. त्यानंतर जोरदार गोळीबार झाला जो बराच वेळ चालू राहिला. या चकमकीत एक जेसीओ जखमी झाला आणि नंतर त्यांचे बलिदान झाले. या संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. तसेच अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. यापूर्वी ११ फेब्रुवारी रोजी याच परिसरात जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात एका कॅप्टनसह दोन जवान हुतात्मा झाले होते.