कांद्याचे दर कडाडले, लसूण २५० पार

0

मुंबई – पावसामुळे भाज्यांची आवक घटल्याने दर चांगलेच कडाडले आहेत. आधीच वाढती महागाई आणि त्यात आता भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. कांदा ४० तर लसूण तब्बल २५० रुपये किलोवर पोहोचला आहे. एकीकडे भाजीपाल्यांची आवक घटली आहे. तर दुसरीकडे मागणी वाढल्याचे चित्र आहे, त्यामुळे दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

पावसाला झालेली सुरुवात आणि आवक कमी झाल्याने उन्हाळी कांद्याचे दर ४० रुपये किलोवर पोहोचले आहेत. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली. पण काही अटी आणि शर्ती घातल्या. त्यामुळे कांद्याचे दर कमी होते. मात्र आता कांद्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे.

बाजारात कांद्याचे घाऊक दर प्रतिकिलो २५ ते ३० रुपये होते. आता त्यात वाढ झाल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला. सध्या बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा ४० रुपये तर दुय्यम प्रतीचा कांदा ३५ रुपये किलोने विकला जात आहे. लसणाचे भाव तर प्रति किलो २५० रुपये पार पोहोचले आहेत.

केवळ लसूण, कांदाच नव्हे तर हिरव्या भाजीपाल्याचे भावही वाढले आहेत. वाल शेंग १००, चवळी शेंग १२०, हिरवी मिरची १२०, वांगे ८०, बटाटे ४० , गावरान टोमॅटो १५० रुपये, अद्रक १८० रुपये प्रति किलो असे भाव आहेत. महिन्याच्या सुरुवातीपासून बाजारात येणारा कांदा हा साठवलेला आहे. केंद्र सरकार कांद्यावरील निर्यात शुल्क हटवेल, अशी अपेक्षा शेतक-यांना आहे. यामुळे चांगला भाव मिळेल या आशेवर शेतक-यांनी कांदा साठवून ठेवला आहे. परिणामी बाजारपेठेत आवक कमी होऊन त्याचे परिणाम कांद्याच्या दरवाढीत झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech