गणेशोत्सवानिमित्त मंत्री लोढा यांच्या माध्यमातून कोकणवासियांसाठी नमो एक्सप्रेसचे आयोजन

0

मुंबई – गणेश उत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामार्फत नमो एक्स्प्रेसचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून सदर ट्रेन आज सकाळी १०.३० वाजता सावंतवाडीला जाण्यासाठी निघाली. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ असा या एक्स्प्रेसचा मार्ग असेल. आज या सुविधेचा १०३४ कोकणवासियांनी लाभ घेतला. प्रवाश्यांसाठी न्याहरी आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, ट्रेनमध्ये स्वच्छता असेल याची काळजी घेण्यात आली होती. या रेल्वेच्या माध्यमातून केलेल्या नियोजनाबद्दल नागरिकांनी मंत्री लोढा यांचे आभार मानले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ घेता यावा यासाठी तिकीट दर १०० रुपये इतक्या माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले होते.

या विषयी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, “गेली १० वर्ष आम्ही गणेशभक्तांच्या सेवेसाठी ट्रेन सोडत आहोत आणि यावेळी सुद्धा तशी व्यवस्था केली आहे यात कोणतेही राजकारण नाही. अशा ट्रेन आम्ही यापूर्वी पंढरपूर आणि अयोध्येसाठी सुद्धा सोडल्या आहेत. जिथे भगवान आहेत, भक्तांची श्रद्धा आहे, तिकडे भाजपा आहे. गणेश उत्सव आपल्या सर्वांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला आतुरता असते आपल्या घरी जाण्याची, आणि श्रीगणेशाची स्थापना करण्याची. त्या सर्वांना आपल्या घरी जाण्यासाठी सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. आज ही ट्रेन पूर्ण भरली आहे, सर्वच नागरिक समाधानी आहेत, याचा आनंद वाटतो. प्रत्येकाचा प्रवास सुखरूप व्हावा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्यांना मिळावा हीच प्रार्थना करतो.” भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या नमो एक्स्प्रेसचे नियोजन करण्यात आले होते. प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी या माध्यमातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना तिकीट देण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech