मुंबई – मुंबईकरांसह लाखो गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज भल्या सकाळी 6 वाजता मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे 91 वे वर्ष आहे. लालबागच्या राजाच्या पाद्य पूजनानंतर मूर्तिकार लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरुवात करतात.
याबाबत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने त्यांच्या सोशल अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे 91 व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन मंगळवार 11 जून 2024 रोजी सकाळी ठीक 6 वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तिकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झाले.
याप्रसंगी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केले. गेली काही वर्षे पाद्यपूजन सोहळा हा फार प्रसिध्दी न करता पूर्वीप्रमाणे घरगुती पध्दतीने मूर्तिकाराच्या चित्रशाळेत करण्याचा निर्णय झाला आहे.