लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सुरु होण्याच्या सुरुवातीलाच एक नवीन वाद समोर आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा शुभारंभ सामना ज्या ठिकाणी होत आहे, त्या स्टेडियमवर भारताचा तिरंगा झेंडा लावण्यात आलेला नाही. त्यामुळे क्रिकेट प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी एक नवीन वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. खरंतर, कराचीच्या नॅशनल स्टेडियममधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियमच्या छतावर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या 7 देशांचे झेंडे फडकवलेले दिसत आहेत, तर भारतीय तिरंगा या रांगेतून गायब आहे. या घडामोडीमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. तथापि, भारताचा राष्ट्रध्वज पाकिस्तानमधील स्टेडियमवर नसण्यामागे काय कारण असू शकते, यावरही सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. असे मानले जाते की भारत त्यांचे सर्व चॅम्पियन्स ट्रॉफी सामने दुबईमध्ये खेळत आहे, म्हणून पाकिस्तानने हे केले असावे. बाकी सर्व संघ पाकिस्तानला येणार असल्याचे त्यांचे राष्ट्रध्वज लावण्यात आले आहेत.
आयसीसीच्या नियमांनुसार, जर एखादा देश बहुराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करत असेल, तर त्याला त्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व देशांचे ध्वज फडकावावे लागतात. पण कराची येथे झालेल्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या आठही संघांपैकी फक्त भारताचा ध्वज दिसला नाही.त्यामुळे आता यावर आयसीसी काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव भारत आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे.तर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना हा २३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा सामना दुबई इंटरनॅशन स्टेडियमवर रंगणार आहे.