भारतीय भाविक देणार श्री कटास राज मंदिरांना भेट
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे. असे असतानाही पाकिस्तानकडून काही भारतीयांना सुखद धक्का देण्यात आला. पाकिस्तानने शुक्रवारी १५४ भारतीयांना एका खास कारणासाठी व्हिसा मंजूर केल्याची माहिती दिली. श्री कटास राज मंदिराला भेट देण्यासाठी १५४ भारतीयांना व्हिसा मंजूर करण्यात आल्याचे पाकिस्तानने सांगितले आहे. भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयाने शुक्रवारी(२१ फेब्रुवारी ) ट्विटरवरून (एक्स) ही माहिती दिली. पाकिस्तान उच्चायोगाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ या कालावधीत श्री कटास राज मंदिरात तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय यात्रेकरूंना व्हिसा देण्याबाबतचे निवेदन चार्ज डी’अफेअर्स साद अहमद वारैच यांनी एक्स वर पोस्ट केले आहे. त्यांनी तीर्थयात्री जाणाऱ्या यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचा प्रवास आध्यात्मिकदृष्ट्या आनंददायी होईल, अशी आशाही व्यक्त केली आहे.
पाकिस्तानी निवेदनानुसार १९७४ च्या पाकिस्तान-भारत प्रोटोकॉलनुसार, दरवर्षी भारतातील हजारो हिंदू आणि शीख यात्रेकरू धार्मिक स्थळांच्या तीर्थयात्रेत विविध प्रसंगी आणि धार्मिक उत्सवांना उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानला भेट देतात. श्री कटास राज मंदिर किला कटास या नावाने देखील लोकप्रिय आहे. या मंदिराच्या संकुलात अनेक हिंदू मंदिरे देखील आहेत. या मंदिराचे संकुल कटास नावाच्या तलावाने वेढलेले आहे. हिंदू ते पवित्र मानतात. येथे येण्यासाठी व्हिसा मंजूर करण्यात आले आहेत. श्री कटास राज मंदिर परिसर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पोतोहार पठार प्रदेशात आहे. पुराणांमध्ये असे म्हटले आहे की मंदिराचे तळे महादेवाच्या अश्रूंनी बनलेले आहे. जेव्हा शंकर भगवान त्यांची पत्नी सतीच्या मृत्युनंतर दुःखाने पृथ्वीवर भटकत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आलेल्या अश्रूंमुळे हा तलाव तयार झाला. हे तलाव दोन कनाल आणि १५ मरळा क्षेत्रात पसरलेले आहे. त्याची कमाल खोली २० फूट आहे.२००५ मध्ये भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी मंदिरांना भेट दिली होती. २००६ मध्ये, पाकिस्तान सरकारने मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले आणि २०१७ मध्ये आणखी सुधारणांची घोषणा केली.