रत्नागिरी : राजापूर प्रतिष्ठानतर्फे रविवारी, दि. १६ मार्च रोजी राजापूरमधील यशोदिन सृष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या पालखी महोत्सवात दहा मानाच्या पालख्या आणि पारंपरिक गोमूचा नाचाचे तीन संघ सहभागी होऊन पारंपरिक शिमगोत्सवातील कलाविष्काराचे सादरीकरण करणार आहेत. सकाळी ८.३० वाजता गगनगिरी महाराज यांचे नातू (वंशज) पपू संजयसिंह पाटणकर (सरकार), प पू गगनगिरी महाराज आश्रम सेवा संस्थान (ओणी-कोंडिवळे) येथील मठाधिपती पपू उल्हासगिरी महाराज, सद्गुरू हभप विश्वनाथ (भाई) गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. सोहळ्याचे अध्यक्षस्थान राजापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे भूषविणार आहेत.
महोत्सवात ग्रामदेवतांच्या पालख्या देवदेवतांसह, पारंपरिक खेळे, ढोल ताशांसह सहभागी होऊन नृत्य सादर करणार आहेत. गावागावात साजरा होणारा हा उत्सव आता राजापूर शहरात एकाच व्यासपीठावर अनुभवता येणार आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक परंपरांचे जतन आणि संवर्धनाच्या हेतूने स्थापन झालेल्या राजापूर प्रतिष्ठानने हा आगळा उपक्रम हाती घेतला आहे.
महोत्सवात श्री महालक्ष्मी उन्हाळे, श्री गांगोदेव कोंढेतड, श्री पंचग्रामदेवता गोठणे दोनिवडे, श्री दुर्गादेवी पाथर्डे, श्री नवलादेवी शेढे, श्री गांगोदेव शीळ, माता पूर्वादेवी हातणकरवाडी, श्री नवलादेवी शीळ, निशाण खेळे बाईंगवाडी, नवजीवन विकास मंडळ तेरवण या दहा मानाच्या पालख्या, बाकाळे, धोपटेवाडी व दिवटेवाडी येथील गोमूचा नाच यांचा सहभाग राहणार आहे. दिवसभर हा सोहळा रंगणार आहे. यातून कोकणच्या लोकसंस्कृतीचा जागर व्हावा, नव्या पिढीमध्ये याविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा असा हेतू असून तरुणांसह आबालवृद्धांनी सोहळ्याला उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आवाहन राजापूर प्रतिष्ठानने केले आहे.