मुंबई : परभणी शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. हा पुतळा उभारण्यासाठी महानगरपालिकेच्या कोर्टाच्या पिटीशनच्या बाहेरील जागा असल्यास, त्यावरील अतिक्रमण पूर्ण पडताळणी करून तात्काळ काढण्यात येऊन जागा पुतळ्यासाठी देण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
याबाबत डॉ. राहुल पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी चर्चेमध्ये सदस्य रोहीत पवार यांनी सहभाग घेतला. मंत्री सामंत म्हणाले, परभणी शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील स्टेडीयम कॉम्लेक्स येथील स्टेडियममध्ये जाण्याकरिता असलेल्या मुख्यप्रवेशद्वारा जवळील जागेत “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणेबाबत महानगरपालिका सर्वसाधारण ठराव दिनांक २६ ऑगस्ट २०१९ रोजी पारित करण्यात आला आहे. ही जागा ताब्यात असलेल्यांनी या जागेकरिता जिल्हा न्यायालय, परभणी येथे दिवाणी दावा दाखल केला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.