पॅरिस- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आल्याने तिच्यासह देशवासीयांची मोठी निराशा झाली. तिने 50 किलो कुस्तीची अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 50 किलो गटात तिचे वजन वजन 100 ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले. सुवर्ण पदक जिंकण्याची संधी होती, मात्र आता तिचे रौप्य पदकही हुकले. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून सांगण्यात आले की, विनेश फोगाट अपात्र ठरणे खेदजनक आहे.
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर ती सुवर्ण पदक जिंकेल, असा विश्वास होता. तिने मंगळवारी महिलांच्या 50 किलो फ्री स्टाइल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव केला होता. विनेशची अंतिम लढत आज (बुधवारी) अमेरिकेच्या ॲन सारा हिल्डब्रँडशी होणार होती. यापूर्वी तिने प्री-क्वार्टर फायनलमध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन आणि चार वेळची विश्वविजेती युई सुसाकीचा 50 किलोमध्ये पराभव केला होता.
विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली. तत्पूर्वी विनेश बाद ठरली. विनेशला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्यानंतर तिचे वजन 50 किलोच्या मर्यादेशी जुळत नसल्याचे सांगण्यात आले. तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.
विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकाकडून उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. यानंतर तिची प्रकृती बिघडली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. डिहायड्रेशनचा त्रास होत झाल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विनेशला काल एका दिवसात तीन लढती खेळाव्या लागल्या. या तीन लढती खेळल्यामुळे तिच्या शरीरातील लिक्विड कमी झाले. म्हणूनच ऑलिम्पिक कमिटीच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार डिहायड्रेट होऊ नये, यासाठी तिला लिक्विड देण्यात आले. त्यामुळेच जेव्हा विनेशचे वजन केले गेले, तेव्हा पोटातील लिक्विडमुळे तिचे वजन वाढले, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनेशने सेमीफायनल जिंकल्यानंतर आराम केला नाही. तिनं रात्रभर जागून तिचं अतिरिक्त वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला. तिने वजन कमी करण्यासाठी सायकलिंग केली, तिनं स्किपिंग केली. एवढंच नाही तर या खेळाडूनं आपले केस आणि नखंही कापली. धक्कादायक बाब म्हणजे, एवढं असूनही विनेशला निर्धारित मर्यादा गाठता आली नाही.