अजंठा कॅटमरॉन बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना निलंबित, प्रवासी वाहतुकीवर निर्बंध

0

मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबाग नजीक समुद्राजवळ अजंठा कंपनीच्या कॅटमरॉन प्रवासी बोटीच्या घटने प्रकरणी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे त्रिसदस्य चौकशी समिती महाराष्ट्र सागरी मंडळाने स्थापन केली असून ती या दुर्घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करणार असून तीन दिवसात समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. तसेच दुर्घटनेतील बोटीचा प्रवासी वाहतुकीचा परवाना हा तत्काळ निलंबित करण्यात आला असून नोंदणी प्रमाणपत्र तसेच सर्वे प्रमाणपत्र देखील मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार तत्काळ निलंबित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या बोटीस पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

अजंठा कंपनीची प्रवासी बोट काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास १३० प्रवाशांना घेऊन गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवा येथे जाण्यासाठी निघाली होती. भर समुद्रात मांडवा जेट्टी पासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असताना बोटीमध्ये समुद्राचे पाणी शिरल्याचे निदर्शनास आले. त्यावर बोटीवरील कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी मांडवा जेट्टी येथे संपर्क साधून तातडीची मदत मागितली मांडवा जेट्टी परिसरात समुद्रात असलेल्या बोटींनी तत्काळ प्रवाशांची मदत करून अपघातग्रस्त बोटीवरील प्रवाशांना दुसऱ्या बोटी मध्ये घेऊन मांडवा जेट्टी येथे बोटींमध्ये सुरक्षित व सुखरूपरीत्या पोहचवले. या घटनेमुळे बोटीवरील प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट निर्माण झाली होती. याबाबत मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आणि सदर दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

मंत्र्यांच्या या आदेशानुसार महाराष्ट्र सागरी मंडळाचे वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी प्रदीप बढीये यांनी त्रिसदस्य समितीची घोषणा केली असून सागरी अभियंता चीफ सर्वेअर प्रकाश चव्हाण हे या समितीचे अध्यक्ष असणार असून, बांद्रा येथील प्रादेशिक बंदर अधिकारी सी .जे. लेपांडे हे सदस्य तर कमांडंट संतोष नायर जे सागरी सुरक्षा व संरक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत ते या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech