सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात मविआच्या महेश कोठेंनी भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुखांसमोर कडवे आव्हान उभे करताना जशास तसे उत्तर देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. शेळगी भाग लिंगायत बहुल म्हणून तर जुना विडी घरकुल भाग तेलगु भाषिकांचा म्हणून ओळखला जातो. देशमुखांनी तेलगु मते खेचण्यासाठी पवन कल्याण यांची तर कोठेंनी लिंगायत मते खेचण्यासाठी शिंदेंची खेळलेल्या चालीमुळे शहर उत्तरची लढत यंदा देशमुखांसाठी सोपी नसल्याचे दिसत आहे.
भाजपच्या देशमुखांच्या प्रचारासाठी पवन कल्याण यांचा तेलगु भाषिक बहुल भागात रोड शो आयोजित करून तेलगु मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याला सडेतोड उत्तर म्हणून तितकेच अनुभवी असलेल्या कोठेंनी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना देशमुखांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या शेळगी भागातील प्रचारसभेसाठी आमंत्रण देत तोडीस तोड उत्तर दिले.